मुंबई : मुंबई शहरावर हल्ला करून दहशत माजविणारे फोन कॉल मुंबई पोलिसांना आता नित्याचेच झाले आहे. मुंबईवर हल्ला करण्यासंदर्भात एक फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्या संदर्भात मुख्य नियंत्रण कक्षाकडून बोरिवली पोलिसांना माहिती 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झाली. यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बोरिवली पोलिसांनी असा कॉल देणाऱ्या व्यक्तीस अवघ्या एका तासात अटक केली आहे. त्या विरोधात कलम 505 (1) (ब) 505 (2) 507, 182 भादवीस नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी अतिशय जलदगतीने आपली तपासचक्रे फिरविली. आरोपीला थोड्याच कालावधीत गजाआड केले.
मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा : मिळालेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी रोजी सात वाजता पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाकडून बोरिवली पोलिसांना मुंबईवर हल्ला करून दहशत माजवण्याच्या फोन कॉल संदर्भात माहिती मिळाली होती. यानुसार काही वेळापूर्वी व्यक्तीने बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ऑटो रिक्षा पकडली. अगोदरच त्या रिक्षात दोघेजण बसले होते. मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा सुरू होती. नंतर या तिघांनी ती रिक्षा गोविंद नगर बोरीवली पश्चिम येथे सोडली. मात्र त्या रिक्षाचा नंबर माहिती नसल्यासंदर्भात फोन कॉल करणाऱ्याने पोलिसांना कळवले होते.
अशी केली कारवाई : प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फोन करणारा व त्या रिक्षाचा शोध घेण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय माडये यांच्या नेतृत्वाखाली एटीसी पथकाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर, इंद्रजित पाटील यांच्या पथकाने गोविंद नगर परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरू असतानाच त्या कॉलरने पुन्हा नियंत्रण कशाला फोन करून कळवले की, त्या रिक्षामध्ये बसून हल्ला करण्याची चर्चा करीत आहेत. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे कॉलरला एकसार डोंगरी परिसरातील घरातून छापा टाकून ताब्यात घेतले. त्याचा फोनची तपासणी केली असता हे कॉल त्यानेच केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वाकोला, खेरवाडी, बीकेसी आणि बोरीवली पोलीस ठाणे येथे विविध गुन्हे नोंद आहे. वाकोला पोलीस ठाणे हद्दीत त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.