मुंबई - सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकाकर्ते दिल्लीचे वकील पुनीत ढांडा यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये काही गडबड असेल. तर तीचे कुटुंबीय कायद्यानुसार योग्य ती पावले उचलतील, असे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.
28 वर्षीय दिशा सालियानने 8 जून रोजी मलाड भागातील एका उंच इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा सालियानच्या मृत्यूच्या संदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल नोंदविला गेला आहे. दिशा सालियान मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे आणि उच्च न्यायालयाने त्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती ढांडा यांनी आपल्या याचिकेत केली होती. तथापि, दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.
दिशाच्या कुटुंबाची भूमिका -
दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मालवणी पोलीस ठाण्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या समाज माध्यमांवर काही बॉलीवूड व राजकारणी व्यक्तींकडून दिशाच्या आत्महत्येसंदर्भात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. याचा कुटुंबाला नाहक मानसिक त्रास होत आहे. अशी तक्रार दिशाच्या वडीलांनी दिली होती. या बरोबरच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत जो काही तपास केला आहे. त्या तपासाला घेऊन आम्ही समाधानी असून आमचा कुणावरही संशय किंवा आरोप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले होते.