मुंबई Tree Cutting In Pune : पुण्यात रस्ता रुंदीकरणाच्या कामात अनेक झाडं तोडली जाणार आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं, "मुंबई उच्च न्यायालयातून निर्णय आल्याशिवाय एकही झाड तोडू नका," असा आदेश दिला होता. आता यावर आज (२१ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे.
तातडीची हस्तक्षेप याचिका दाखल केली : पुणे महापालिकेनं पुण्यातील रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. यासाठी हजारो मोठी झाडं तोडली जाणार आहेत. पुणे महापालिकेनं या दृष्टीनं कारवाईही सुरू केली होती. मात्र याला एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं. याचिकाकर्त्यानं सर्वोच्च न्यायालयात तातडीची हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं पुणे महापालिकेला आदेश दिला होता. "मुंबई उच्च न्यायालयातून २१ डिसेंबरपर्यंत यावर निर्णय येऊ द्या. तोपर्यंत एकही झाड तोडू नका", असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं होतं.
याआधीही याचिका दाखल होती : अमित गुरुचरण सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती. "पुणे महापालिका गणेशखिंड रस्त्यावरील झाडं मोठ्या प्रमाणात तोडणार आहे. वृक्षांची ही कत्तल थांबवण्यात यावी", अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. मुंबई उच्च न्यायालयात ऑक्टोबर २०२३ मध्ये अशाच एका प्रकरणात याचिका दाखल झाली होती. त्यावेळी उच्च न्यायालयानं, वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आक्षेप आणि सूचनांचा विचार करुन वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असा आदेश दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालय यावर आज काय निर्णय घेतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे वाचलंत का :