मुंबई - कोरोना संक्रमणाच्या काळात लॉकडाऊन असतानाही गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारकडून काही नियमावली लागू करण्यात आली होती. या नियमांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. संतोष गुरव, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं असेल तर कोव्हिड निगेटिव्ह असलेलं मेडिकल सर्टिफिकेट देणे बंधनकारक होते. तरच संबंधित व्यक्तीला कोकणात जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. मात्र, या प्रकारचे आदेश हे मानवी मूलभूत हक्कांच्या विरोधात असून यामुळे मानसिक तणाव निर्माण होत आहे. राज्य शासनाने लादलेले नियम हे अवैज्ञानिक असल्याचे याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते.
या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केके तातेड व न्यायमूर्ती एम. एस. जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याने या संदर्भात कुठलाही ही डेटा उपलब्ध केलेला नसल्याचे म्हटले आहे. या शिवाय राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना संक्रमण हे नियंत्रणात असल्याचेही म्हटले आहे. सोशल डिस्टंसिंग नियम, मास्कचा वापर यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना त्याचा परिणाम ही सध्या दिसून येत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.