मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये बॉलिवूड आणि सेक्स रॅकेटचे मोठे कनेक्शन असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. भारतात येणाऱ्या विदेशी तरुणींना बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो म्हणून वेश्याव्यवसायत ढकलणाऱ्या नावेद शरीफ अहमद अख्तर (26) आणि बॉलिवूडमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर व कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या नाविद सादिक सय्यद (22) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात समाजसेवा शाखेने कारवाई करीत 10 भारतीय व विदेशी मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 20 जानेवारीला अंधेरी पूर्व येथील इम्पेरियल पॅलेस या तीन तारांकित हॉटेलवर टाकलेल्या छाप्यामध्ये 3 तरुणींची सुटका करण्यात आली. या तीन जणांमध्ये दोन तरुणी या तुर्कमेनिस्तानच्या नागरिक असून स्टुडंट व्हीसा घेऊन भारतात आल्या होत्या. या दोन तरुणींनी पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये कला शाखेत प्रवेश घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही तरुणी अटक आरोपींच्या संपर्कात होत्या. बॉलिवूड ही मोठी इंडस्ट्री असून यामध्ये विदेशी तरुणींना काम करण्यासाठी मोठा वाव आहे. मात्र, त्यासाठी स्क्रीन टेस्ट देण्यासाठी काही गोष्टींची तडजोड करावी लागते, असे सांगत नाविद व नावेद या दोन आरोपींनी एका महिला वेश्या दलालाच्या माध्यमातून पीडित तुर्कमेनिस्तानच्या तरुणींना देहविक्री करण्यास भाग पाडले होते.
20 जानेवारीला ऑनलाईन व व्हाट्सअॅपसारख्या माध्यमातून ग्राहकांना या तरुणींचे फोटो पाठविण्यात आले होते. समाजसेवा शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून बनावट ग्राहक बनवून या विदेशी मुलींसाठी तब्बल 40 हजारांचा सौदा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच धाड मारून विदेशी तरुणींसोबत एका भारतीय महिला मॉडेलची सुटका केली आहे.
कसं चालतंय बॉलिवूड सेक्स रॅकेट -
बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात तरुण, तरुणी या भारतात येऊन थेट मुंबई गाठत आहेत. मुंबईतील अंधेरी, वर्सोवा आणि जुहू परिसरात वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सिरीयल, सिनेमा व जाहिरातीत काम मिळविण्यासाठी सध्या या तरुणी धडपडत असतात. मात्र, बॉलिवूडसारख्या ठिकाणी संघर्ष करूनही काम न मिळालेल्या तरुणींना हेरून त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत कास्टिंग डायरेक्टर व प्रॉडक्शन हाऊसच्या मॅनेजरकडून छुप्या पद्धतीने हे सेक्स रॅकेट चालवले जात आहे. 40 हजार ते 1 लाखांपर्यंत भारतीय व परदेशी मॉडेलचा सौदा करून हे रॅकेट सध्या मुंबईसारख्या शहरात सक्रिय आहे. ज्यावर समाजसेवा शाखेने आता धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसात समाजसेवा शाखेने केलेली कारवाई -
- जुहू परिसरात झेंड लॅक्सरी हॉटेलवर 1 जानेवारीला छापा मारून 2 उजबेकिस्तानच्या तरुणींची सुटका करत बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर राजेश कुमार कामेश्वर लाल या आरोपीला अटक केली.
- अंधेरी येथील जे पी रोड वरील कॅफे कॉफी डे वर छापा टाकून 14 जानेवारीला बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या 2 ज्युनियर आर्टिस्टची सुटका, तर कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या नवीन कुमार प्रेमलाल आर्या या वेश्या दलालास अटक केली.
- अंधेरीमधील ड्रॅगन फ्लाय या तीन तारांकित हॉटेलवर 16 जानेवारीला समाजसेवा शाखेने छापा टाकत 3 तरुणींची सुटका केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा सामावेश होता. तसेच तिने एका वेब सिरीजमध्ये काम केले होते. दुसरी पीडित मुलगी मराठी मालिकामधील अभिनेत्री असून तिसरी अभिनेत्री ही सावधान इंडियामधील अभिनेत्री आहे.