मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे सिनेसृष्टी ठप्प आहे. प्रत्यक्ष शुटिंगला काही प्रमाणात सुरुवात झालेली असली तरिही कमीत कमी लोकांसोबत काम करण्याचे बंधन सरकारने निर्मात्यांना घातले आहे. त्यामुळे सिनेमा आणि इव्हेंट्समध्ये स्टार्सच्या मागे नृत्य करणाऱ्या बॅक डान्सर्सवर (पार्श्व नृत्य कलाकार) अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच अशाच काही डान्सर्सना अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे.
'ऑल इंडिया फिल्म टेलिव्हिजन अँड इवेंट्स डान्सर्स असोसिएशन'चे सदस्य असलेल्या 600 डान्सर्सना जॅकीने मदतीचा हात देऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवली आहे. लॉकडाऊनच्या अवघड काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी स्वतः पुढाकार घेत कामगारांची गरज भागवली होती. यात जॅकीचा देखील समावेश झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात याच नाही तर अन्य काही संस्थांच्या माध्यमातून जवळपास तीन कोटींची मदत त्याने गरजूंना केलेली आहे.
जॅकी गेले काही दिवस सिनेमांमधून गायब असला तरिही आपल्या जेजस्ट म्युझिकच्या माध्यमातून अनेक नवोदित संगीतकार आणि गायकांसोबत तसेच डान्सर्ससोबत तो काम करतो आहे. याच लेबलअंतर्गत मुस्कुराएगा इंडिया या नावाने त्याने यापूर्वी गरजूंना मदत देऊ केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे कर्मचारी पीपीई किट्सशिवाय काम करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्या वतीने जवळपास एक हजार पीपीई किट्स मुंबई महानगरपालिकेला दिले होते.
या संकटकाळात आपल्याकडून गरजूंना लागेल तेवढी मदत करणे हे आपलं कर्तव्य असल्याचे मत जॅकीने व्यक्त केले आहे, तर दुसरीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जॅकीने जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्याबद्दल या 600 डान्सर्सनी त्याचे जाहिर आभार मानले आहेत.