मुंबई: मुंबई पालिकेचे (Mumbai Municipal Corporation) संपूर्ण शहरात ७ परिमंडळ आहेत त्यातील परिमंडळ ३ मधील वांद्रे पूर्व-पश्चिम, अंधेरी पूर्व भागातील अनेक ठिकाणी पाणी गळती थांबविण्यासाठी विविध कामे (water works in Mumbai suburbs) केली जाणार आहेत. ही सर्व कामे करतानाच त्या जोडीला रस्त्यांची कामे रस्ते विभागाकडून केले जाणार आहेत. या कामांत १५ मिमी ते १०० मिमीपर्यंतच्या व्यासाची जलजोडणी केली जाणार आहे. या कामासाठी पालिकेने ४ कोटी ७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यासाठी मागविलेल्या निविदांमध्ये उणे ३७.७१ टक्के दराच्या निविदेस पसंती देण्यात आली आहे. कमी दराच्या निविदेमुळे पालिकेस इथल्या कामासाठी एकूण ३ कोटी ४४ लाख रुपये खर्च येणार आहे.
या विभागात होणार कामे
पश्चिम उपनगरातील गोरेगाव, मालाड, अंधेरी पश्चिम आदी भागात पाण्याची गळती थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने ३ कोटी ९३ लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले होते. प्रत्यक्षात उणे ३७.९९ टक्के दराच्या निविदेने पालिकेस त्यासाठी ३ कोटी ३१ लाख रुपये इतका खर्च करावा लागणार आहे. पूर्व उपनगरातील चेंबूर पूर्व-पश्चिमेत जलवाहिन्या बदलण्यासाठी ६ कोटी ७१ लाख रुपयाचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार केले होते. त्यासाठी उणे ३३.४५ टक्के दराच्या लघुत्तम निविदेस पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे, या ठिकाणी सर्व कर, आकार मिळून खर्च ५ कोटी ७६ लाख रुपये खर्च येणार आहे.
बेलासिस पुलाकडील जलवाहिनी बदलणार
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंटतर्फे बेलासिस पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. त्या पुलावरील ६०० मिमी ग्लास रेनफोर्स्ड प्लास्टिक जलवाहिनी असून त्यातून गळतीची तक्रार दूर सारण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. पालिकेने या ठिकाणी भूमिगत जलवाहिनी टाकण्याची सूचना पश्चिम रेल्वेस केली होती. परंतु, त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेने जलवाहिनीसाठी स्वतंत्र पोलादी पूल बांधण्यास रेल्वेस २३ कोटी रुपयाचा निधी दिला होता. त्यावर नवीन ३३० मीटर लांबीची आणि ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी पालिकेने ३ कोटी ४० लाख रुपयाचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार केले होते. त्यासाठी उणे १२.२६ टक्के दराच्या सर्वात लघुत्तम निविदाकारास पालिकेस पसंती दिली आहे. त्यामुळे या जलवाहिनीसाठी ३ कोटी ९१ लाख इतका खर्च येणार आहे.