मुंबई - कोरोना विषाणू विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूबाबत दोन लसींना मान्यता दिली आहे. मुंबईमध्ये लस प्राप्त होताच पुढील २४ तासात लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. हा पहिला टप्पा पंधरा दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. यासाठी प्रतिदिन १२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
२४ तासात लसीकरण सुरू -
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहेत. मृत्यूंची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणांमार्फत लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वा लाख वैद्यकिय खात्यातील लोकांना लस टोचली जाईल. लसीकरणासाठी आठ केंद्रे सज्ज आहेत. या लसीकरण केंद्रांपैकी केईएम, नायर, कूपर आणि सायन रुग्णालयात दररोज दोन हजार लोकांना लस देण्याचे नियोजन आहे. तर भाभा रुग्णालय (वांद्रे), व्ही.एन. देसाई हॉस्पिटल (सांताक्रूझ), राजावाडी हॉस्पिटल (घाटकोपर) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल (कांदिवली) या उर्वरित चार केंद्रे दररोज प्रत्येकी एक हजार लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण १२ ते १५ दिवसांत पूर्ण व्हावे, यासाठी मनपाने नियोजन केले आहे. त्यासाठी २ हजार २४५ पॅरामेडिकल स्टाफची एकूण ५०० पथके तैनात आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण दिले गेले आहे.लस उपलब्ध होताच, अवघ्या २४ तासात प्रत्यक्ष लसीकरण सुरू केले येईल, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
केंद्रांची संख्या ५०पर्यंत वाढणार -
मुंबईत सध्या आठ लसीकरण केंद्रे आहेत. प्रत्येक प्रभागात किमान दोन लसीकरण केंद्रे असावीत, असे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार टप्पाटप्प्याने हे केंद्र ५० पर्यंत वाढवली जातील. नव्या केंद्रासाठी शालेय आणि प्रशासकीय इमारतींचा मनपाने आढावा घेतल्याचे काकाणी यांनी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात अल्पवयीन मुलांना लस -
पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वा लाख आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलिस कर्मचारी आणि कंझर्व्हेन्सी कामगारांचा समावेश आहे. तर तिसर्या टप्प्यात सुमारे ५० लाख नागरिकांना लस दिली जाईल. त्यापैकी ३० लाख लोक ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणात संबंधितांची माहिती घेतली आहे. अल्पवयीन मुलांना देखील या टप्प्यात लस दिली जाणार आहे.
कांजूरमधून आठ केंद्रांवर लस पुरवठा -
कांजूरमार्ग येथील पाच मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बीएमसीने लस साठवण्यासाठी ५ हजार चौरस फूट क्षेत्र निश्चत केले आहे. या सुविधेमध्ये दोन वॉक-इन कूलर (डब्ल्यूआयसी) आणि एक वॉक-इन फ्रीजर (डब्ल्यूआयएफ) असणार आहेत. प्रत्येक डब्ल्यूआयसीची क्षमता ४० क्यूबिक मीटर आहे. तर त्याचे तापमान - ८० डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल. तर डब्ल्यूआयएफची क्षमता २० क्यूबिक मीटर असेल आणि तापमान - १५ आणि - २५० डिग्री सेल्सिअस दरम्यान असणार आहे. तसेच २२५ लिटर क्षमतेसह प्रत्येकी सतरा आईस-रेटेड रेफ्रिजरेटर (आयएलआर) राज्य सरकारकडून पुरवले जाणार आहेत. या आयएलआरमार्फत प्रत्येक लसीकरण केंद्रावर आठ रेफ्रिजरेटर वितरित केले जातील, अशी माहिती काकाणी यांनी दिली