मुंबई - शहरात गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी धाडी टाकून संबंधित आस्थापना सील करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानंतर पालिकेने अंधेरी येथील ३२ हॉटेल, रेस्टॉरंट, पब, मंगल कार्यालय आदींना नोटीस बजावल्या आहेत. तर वरळी येथील एका रेस्टॉरंट, पबमधील १७ जणांवर मास्क न घातल्याने कारवाई केली आहे.
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. दोन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर टप्प्याटप्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली. मात्र, वाढती गर्दी, मास्क न घालणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणे आदी कारणांमुळे पुन्हा मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्याने मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे. लॉकडाऊन पुन्हा लागल्यास त्याला बेशिस्त मुंबईकर स्वत; जबाबदार असणार आहेत. हा लॉकडाऊन लावून घ्यायचा की नाही हे मुंबईकरांच्या हातात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
पालिकेची कारवाई सुरू -
रुग्ण संख्या वाढू लागल्याने मुंबई महापालिकेने गर्दी होणाऱ्या रेल्वेमध्ये मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, पब, मंगल कार्यालय आदी ठिकाणी गर्दी होते, मास्क लावले जात नसल्याने समोर आले आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी धाडी टाकून हॉटेल, रेस्टॉरंट, पब, मंगल कार्यालय आदी ठिकाणे सील करण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने अंधेरी पश्चिम येथील ३२ हॉटेल, पब रेस्टॉरंट, मंगल कार्यालयाना नोटीस दिल्या आहेत. तर वरळी येथील रेस्टॉरंट पबवर कारवाई करत मास्क न घालणाऱ्या १७ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ -
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊन, दिवसाकाठी ३०० ते ४०० एवढी कमी झाली होती. मात्र, पुन्हा एकदा आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. १४ फेब्रुवारीला ६४५, १५ फेब्रुवारीला ४९३, १६ फेब्रुवारीला ४६१, १७ फेब्रुवारीला ७२१, १८ फेब्रुवारीला ७३६ तर काल १९ फेब्रुवारीला तब्बल ८२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.