मुंबई - कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये मुंबईतील सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने, बगीचे, क्रीडांगणे बंद होती. याच कालावधीत उद्यान व मैदानांच्या देखभाल व दुरुस्तीवर तब्बल २२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे विद्यमान कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आला असताना त्यांना कालावधी वाढवून ही रक्कम खर्च करण्यात आल्याने पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोरोना काळात मुंबईकरांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप केला जात असून या प्रस्तावावरून स्थायी समितीत गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील २४ विभागांतील महापालिकेची उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे इत्यादी जागेचा विकास व देखभालीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. जानेवारी २०१७ रोजी २४ विभागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली. या तीन वर्षांसाठी १८० कोटी ६८ लाख रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. हा कालावधी ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आला. मात्र, या कंत्राटदारांशी उद्यान विभागांच्या अधिकार्यांशी साटेलोटे असल्याने त्यांनी याची निविदा काढण्यास विलंब केला. परिणामी कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पुढील निविदा प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे जुन्याच कंत्राटदारांकडून पुढील कामे करून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे २३ मार्चपासून सप्टेंबर २०२० पर्यंत मुंबईतील उद्याने व मैदाने ही नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या उद्यान व मैदानांमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. परंतु याच लॉकडाऊनच्या काळात मैदान व उद्यानांसह वाहतूक बेटांवर २१ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. महापालिकेने या कंत्राटदारांना १८० कोटी ६८ लाख रुपयांचे कंत्राट दिलेले असताना त्याच कंत्राटदारांना सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे या वाढीव कालावधीत २१ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून कंत्राटदारांना ही वाढीव रक्कम देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.