मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
अर्थसंकल्पात मुंबईकरांचा हातभार : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०२३-२४ या वर्षाकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. सदर अर्थसंकल्पीय अंदाज दिनांक ५ फेब्रुवारी, २०२३ पूर्वी सादर करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने बृहन्मुंबईतील नागरिकांना पालिकेकडून आवाहन करण्यात आलं आहे. ज्या नागरिकांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर, त्यांनी दिनांक २८ जानेवारी, २०२३ पर्यंत ई-मेल आयडी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in यावर सदर सूचना पाठवाव्यात, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.
या पत्त्यावर पाठवा लेखी सूचना : अद्यापही काही नागरिक लेखी निवेदन आणि आपल्या तक्रारी मांडत असतात. त्यामुळे ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील तर, त्यांनी दिनांक २८ जानेवारी, २०२३ पर्यंत प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ या पत्यावर पाठवाव्यात, असं आवाहन पालिकेने केले आहे.
अर्थसंकल्पात गाजणार 600 कोटींचा घोटाळा : दरम्यान, एका बाजूला माजी मंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे हे बीएमसीतील कंत्राटांच्या कामावरून घोटाळ्याचा आरोप करत आहेत. त्यांनी 600 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत, हा खर्च तुम्ही पालिकेच्या अर्थसंकल्पात कसा दाखवणार? असा सवाल केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी तयारीला लागलेली महानगरपालिका जनतेतून येणाऱ्या प्रश्नांना नेमकी कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच केंद्र सरकारने देखील वर्षे 2023-24 च्या अर्थसंकल्पासाठी लोकांकडून सुचना मागवल्या होत्या. नागरीकांना केंद्र सरकारला 10 डिसेंबर पर्यंतच सुचना पाठवायच्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई अर्थसंकल्पासाठी देखील मुंबई वासियांच्या सुचना मागविण्यात आल्या आहेत.