मुंबई: १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबईमध्ये गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेतर्फे मूर्तिकारांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीतील काही अटींमुळे मूर्तिकार संभ्रमात आहेत.
काय आहे नियमावली?
- घरगुती गणपतीसाठी गणपतीच्या मूर्तीची उंची ही जास्तीत जास्त ४ फुटांचीच असावी.
- घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्यात यावे.
- कमी उंचीच्या सार्वजनिक गणपती मूर्तीचे विसर्जन सुद्धा कृत्रिम तलावात करण्यात यावे.
- गणेशाची मूर्ती ही 'पीओपी'ची असल्यास मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर लाल रंगाचे वर्तुळ करण्यात यावे.
- गणेशाची मूर्ती ही शाडूची असल्यास मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर हिरव्या रंगाचे वर्तुळ करण्यात यावे.
- गणेश मूर्तिकारांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगीसाठी विभाग कार्यालयात अर्ज करणे शक्य आहे.
- पर्यावरण पूरक मूर्ती बाबत तशा पद्धतीचा फलक मूर्ती तयार करण्याच्या ठिकाणी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
सर्वांनाच शाडूच्या मूर्ती परवडणाऱ्या नाहीत : दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान 'पीओपी'चा मुद्दा हा काही नवीन विषय नाही. मूर्तिकार हे गणेशोत्सवाच्या सात-आठ महिन्या अगोदर पासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू करतात. माघी गणपती संपल्यानंतर मूर्तिकार गणेशोत्सवाच्या तयारीला लागतात. सध्याच्या वाढत्या महागाईत सर्वच गणेश भक्तांना शाडूच्या मातीच्या मूर्ती आणणे परवडणारे नसते. अशात अनेक जण पीओपी पासून तयार केलेल्या मूर्ती घेण्यात समाधान मानतात. परंतु नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या तोंडावर घरगुती गणपतीसाठी पीओपीला बंदी घातली आहे. पीओपीमुळे पर्यावरणाची हानी होते आणि या कारणास्तव सर्व घरगुती गणपती हे शाडूच्या मातीचे किंवा पर्यावरण पूरक घटकांपासून बनवलेले असावेत. त्याचबरोबर त्याची उंची जास्तीत जास्त ४ फुटापर्यंत असावी असा आदेश जारी केला आहे.
काय म्हणतात मूर्तिकार? महापालिकेच्या या निर्णयाचे काही मूर्तिकारांनी स्वागत केले आहे. जे वर्षानुवर्षे शाडूच्या मातीची मूर्ती बनवत आले आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध मूर्तिकार बाळाराम पाटील हे अनेक वर्षांपासून शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवत आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी सर्वांनाच शाडूच्या मातीच्या मूर्ती घेणे परवडणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता तेवढ्या प्रमाणात शाडूची माती उपलब्ध होणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पीओपी पासून तयार केलेल्या मुर्त्या या दिवसाला आठ ते दहा असू शकतात. परंतु शाडूच्या मातीपासून एक मूर्ती बनवायला कमीत कमी सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो. त्यातच वाढत्या महागाईत मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे मातीपासून ते रंगापर्यंत भाव वाढले असल्याकारणाने मूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत.
शाडूच्या मूर्तीला अधिक वेळ: पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महापालिकेने हा निर्णय घेतला असला तरी सुद्धा याबाबत अजूनही अनेक जणांच्या मनात संभ्रम आहे. शाडूच्या मातीपासून बनवल्या जाणाऱ्या मूर्तींना लागणारा कालावधी जास्त असतो. गणपती कारखान्यात गणपती बाप्पाची विविध रूप साकारली जात असताना त्यासाठी होणारी आगाऊ बुकिंग करणे फार महत्त्वाचे असते. अशात ऐन मोक्यावर गणेश भक्तांकडून त्यांच्या आवडीची शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणपती बाप्पाच्या मूर्तीची मागणी आल्यास ती पुरवणे कठीण होणार आहे. त्यासोबत मूर्तिकार मयुरेश पाटील म्हणतात की, शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवताना अनेक बारकाईने गोष्टी बघाव्या लागतात. मूर्ती घडवण्यापासून तिला अंतिम रंग रूप देण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी हाताळाव्या लागतात त्यात अधिक वेळ लागतो.
शेलार यांच्या भूमिकेकडे लक्ष? भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मूर्तिकारांसोबत बैठक घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी आणली जाणार नाही, असे सांगितले होते. त्याचबरोबर महानगरपालिकेने त्या पद्धतीचा निर्णय घेतला तर त्याच्या विरोधात मूर्तिकारांना आमचा पाठिंबा असेल, असेही जाहीर केले होते. पर्यावरणाची हानी होण्यास फक्त प्लास्टर ऑफ पॅरिस जबाबदार नसून मुंबईत इतर कारणाने सुद्धा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाने आता आशिष शेलार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.