मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याची धावपळ महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीत सुरू झाली आहे.
मागील आठवड्यात साडेसातशे कोटींच्या प्रस्तावांना तडकाफडकी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता उद्या (मंगळवारी) २१२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. एका आठवड्यात पालिका प्रशासनाचा १ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्याचा आटापिटा सुरू आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत साडेसातशे कोटींचे ८० प्रस्ताव अर्ध्या तासात मंजूर केले. प्रस्ताव मंजूर करताना शिवसेनेची कोंडी करण्याचा सतत प्रयत्न भाजप करीत होते. मात्र, निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाची युती झाल्यानंतर शिवसेना भाजपचे नांदा सौख्यभरे असे सुरू झाले आहे.
पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपने आता सुरात सूर मिसळले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी विकास कामांचे साडेसातशे कोटींचे ८० पैकी ६२ प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात आले. यामध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नाल्याचे बांधकाम, उड्डाणपुलाच्या खाली सुशोभिकरण, पाण्याची गळती रोखणे, शाळेची दुरुस्ती कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचार्यांसाठी निवासस्थान, शहरात जलवाहिन्याचे काम, रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम आदी महत्वाचे प्रस्तावांचा यात समावेश होता.
मंगळवारी मंजूर होणारे प्रस्ताव -
- नाल्यांमध्ये गाळ काढणे ३३ कोटी
- पाणी गळती रोखण्यासाठी २८ कोटी
- रस्ते काँक्रीटीकरण ६४ कोटी
- उद्यानासाठी २५ कोटी
- जलवाहिन्या टाकण्यासाठी ५ कोटी
- मलनी:सारण वाहनांसाठी ९७ कोटी