मुंबई - राज्य सरकारने १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावला आहे. हा लॉकडाऊन शिथिल कारण्यासाठी पाच स्थर करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईचा समावेश तिसऱ्या स्थरात केला गेला आहे. दुसऱ्या आणि पहिल्या स्थरात आल्यास मुंबईमधील लॉकडाऊन पूर्णतः उठवता येणार आहे. त्यासाठी पालिकेने कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी पाऊले उचलली आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई तिसऱ्या स्थरात -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. "मिशन बिगिन अगेन"अंतर्गत राज्यातील निर्बंधासाठी स्तर निश्चित करण्यात आले. राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यात पाच स्थरात लॉकडाऊन उठवला जाणार आहे. त्यानुसार मुंबईत आज ७ जूनपासून याची अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ टक्के तर मुंबईमधील १२.५१ टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबई पॉझिटिव्हिटी रेटनुसार तिसऱ्या तर ऑक्सिजन बेडच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यात आहे. पॉझिटिव्हिटी ५ टक्क्यांहून अधिक असल्याने मुंबईचा समावेश तिसऱ्या स्थरात करण्यात आली आहे. ब्रेक द चैन नुसार अनलॉकडाऊनबाबत करण्यात आलेल्या नियमानुसार मुंबईत तिसऱ्या स्थराची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर -
मुंबई मॉडेलचे नाव सर्वंत्र घेतले जात होते. मुंबईचा आदर्श सर्वानी घ्यावा, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या होत्या. मात्र तीच आदर्श असलेली मुंबई तिसऱ्या स्थरात फेकली गेली आहे. यामुळे मुंबईचे नाव पुन्हा दुसऱ्या व नंतर पहिल्या स्थरात आणण्याचे मोठ आव्हान महापालिका प्रशासनावर आहे. याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ५५० दिवस इतका आहे. नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. ७०० ते ९०० रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ टक्के इतका आहे. दुसऱ्या स्थरात येण्यासाठी ५ टक्क्याहून कमी पॉझिटिव्हिटी रेट आवश्यक आहे. येत्या काही दिवसात पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर दिला जाईल. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या किंवा पहिल्या स्थरात होऊ शकेल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आता मुंबईत हे नियम लागू -
सध्या मुंबईत तिसऱ्या स्थराप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद आहेत. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत आहेत. महत्त्वाची खाजगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू आहेत. तर, शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू आहेत. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी, महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकामस्थळी राहून काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना कामाची मुभा आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल, तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमता नुसार सुरू आहे. पालिकेने दुसऱ्या किंवा पहिल्या स्थरात स्थान मिळवल्यास सध्या असलेल्या नियमात आणखी सूट मिळणार आहे. मुंबईमधील दुकाने दिवसभर सुरु ठेवता येणार आहेत. नागरिकांवर असलेले निर्बंधही आणखी कमी केले जातील.
…तर सामान्यांना ट्रेन मधुन प्रवास शक्य -
राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार लेव्हल ३ मधील शहर आणि जिल्ह्यांमध्ये लोकल ट्रेनमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिलांना प्रवेश द्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, महिलांना अशी सूट दिली जाणार नसल्याचे, पालिकेने स्पष्ट केले आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यास मुंबईचा समावेश दुसऱ्या किंवा पहिल्या स्थरात होईल. असे झाल्यास रेल्वेमधून सामान्य नागरिकांना प्रवास करता येणार आहे. यामुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
पॉझिटिव्ह रेटवर रेल्वे प्रवास -
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतली लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या-त्या लेव्हल नुसार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईचा पॉझिटिव्ह रेट झपाट्याने कमी झाला, तर लवकरच मुंबईकरांना लोकल सेवा खुली केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहे.