मुंबई - गोरेगाव पूर्व आंबेडकरनगरमधली उघड्या गटारामध्ये बुधवारी रात्री ३ वर्षांचा लहान मुलगा पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. या वाहून गेलेल्या मुलाला शोधण्याच्या कामाला प्राथमिकता दिली जात आहे. याप्रकरणी आताच कोणाला दोषी ठरवणे योग्य नसल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, एनडीआरएफच्या मदतीने आता या मुलाचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली.
गोरेगाव पूर्व आंबेडकरनगर येथे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दिव्यांश सिंह हा मुलगा घराबाहेर फिरत असताना बाजूच्याच एका उघड्या गटारात पडला. गटारात पाण्याचा प्रवाह असल्याने तो पाण्यासह वाहून गेला. या मुलाचे शोधकार्य अद्यापही सुरु आहे. या घटनेला दोषी असलेल्या अधिकारी आणि अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे आणि राष्ट्र्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.
या घटनेबाबत सकाळी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. या घटनेची माहिती घेऊन त्यानंतर प्रतिक्रिया दिली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सायंकाळी पुन्हा संपर्क साधला असता, या नाल्याच्या सफाईचे काम २९ जूनला करण्यात आले होते. त्यावेळी या नाल्यावर सिमेंटची झाकणे लावण्यात आली होती. मात्र, याठिकाणी पाऊस जोरात पडत असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणीतरी ही झाकणे काढली असावीत. सध्या या प्रकरणी कोणालाही दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. वाहून गेलेल्या मुलाला शोधण्याच्या कामाला प्राथमिकता दिली जात असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.