मुंबई - मुंबईतील कोरोना रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेने 'मिशन सेव्ह लाईव्हज' मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतंर्गत विविध यंत्रणांच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांवर नजर ठेवली जाते. प्रत्येक रुग्णालयातील गंभीर रुग्णांची एक स्वतंत्र यादी तयार केली जाते आणि त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवले जाते. दररोज, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉक्टरांशी दोनदा सल्लामसलत केली जाते, टास्क फोर्सच्या सदस्यांमार्फत तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो आणि गंभीर रुग्णांची सतत व्हिडिओच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या सेवांसह अत्याधुनिक व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
'सेव्ह लाइव्ह स्ट्रॅटेजी' - मुंबईत मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पालिका आयुक्तांनी 'सेव्ह लाइव्ह स्ट्रॅटेजी'ची घोषणा केली होती. त्यानुसार आयुक्तांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली होती. मृत्यूचे व्हिडीओ ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन काढून रुग्ण शौचालयात जात असल्याने त्यांना बेडजवळ पॉट देण्याचेही आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते.
'मिशन सेव्ह लाईव्हज' - मुंबईतील मृत्यू दर अद्याप कमी झालेला नाही. मुंबईत 5.4 टक्के मृत्यू दर आहे. हा दर 3 टक्क्यांवर आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी 'मिशन सेव्ह लाइव्हज' सुरू केले आहे. त्यानुसार वृद्ध आणि कोरोना रुग्णांवर विशेष लक्ष दिले जात आहे. खासगी रुग्णालयातील मृत्यूंचे ऑडिट केले जात आहे. प्रत्येक कोरोना मृत्यूचा शोध घेण्याच्या सूचना वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. कोणत्या स्टेजला मृत्यू होत आहे, प्रकृती गंभीर होण्या मागे काय कारणे आहेत त्याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वृद्ध आणि आजारी रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
महिनाभरात मृत्यू दर घसरला - गेल्या महिनाभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मृत्यू दर कमी करण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. गेल्या महिनाभरात म्हणजेच 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या काळात मृत्यू दर 2.2 टक्के राखला आहे. या कारणाने मुंबईतील मृत्यू दर 5.4 टक्क्यावरून 4.6 टक्के इतका झाल्याची माहिती माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
8 हजार 747 मृत्यू - मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 96 हजार 459 वर तर मृतांचा आकडा 8 हजार 747 वर पोहचला आहे. मुंबईतून आतापर्यंत 1 लाख 58 हजार 749 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शहरात सध्या 28 हजार 568 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
खासगी डॉक्टरांची सेवा - रुग्णांवर चांगले उपचार करता यावेत म्हणून पालिकेने खासगी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे. मुंबईमधील खासगी रुग्णालयातील 35 जेष्ठ डॉक्टरांची सेवा पालिकेच्या जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये दिली जात आहे. दूरध्वनी आणि प्रत्यक्ष भेट याद्वारे ही सेवा दिली जात आहे. खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर चांगले उपचार करता येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
10 टक्के बेड रिक्त - मुंबईत कोविड रुग्णांच्या घटना मोठ्या प्रमाणात नोंदविल्या जात असल्या तरी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स तसेच शाळा व महाविद्यालये वगळता आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे बहुतेक सेवा व व्यवसाय संस्था सुरू झाल्या असून लोकांची वर्दळ वाढली आहे. पालिकेने चाचणीत 90 टक्के वाढ केली आहे. मुंबईतील बेडची उपलब्धता समाधानकारक असून 17,500 कोविड बेडपैकी जवळपास 5,500 बेड रिक्त आहेत. तसेच मुंबईत 8,800 ऑक्सिजन बेड आणि 1,100 व्हेंटिलेटर बेडपैकी जवळपास 10 टक्के बेड रिक्त आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.