मुंबई - कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. हा विषाणू इतर देशांमधून येणाऱ्या लोकांमधून भारतात पसरत असल्याने देशाबाहेर सर्व टूर रद्द करावेत, अशी विनंती करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यासाठी मुंबईमधील सर्व टूर ऑपरेटरांना पत्र देणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
चीनमध्ये थैमान घातलेला कोरोना विषाणू आता जगभरात पसरला आहे. यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यांच्यावर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दुबई येथून आलेल्या दोन जणांचा समावेश आहे. या दोघांच्या संपर्कात आलेले सहा रुग्ण मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी दोन जणांना सर्दी आहे. त्यांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी देशाबाहेरील सर्व टूर रद्द करावेत, अशी विनंती करणार असल्याचे सांगितले. तसेच सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणू पसरला नसल्याने शाळा बंद करण्याची गरज नाही. राज्य सरकार जे आदेश देईल त्याप्रमाणे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी सांगितले.