मुंबई - राज्याच्या काही भागात घबराट निर्माण करणा-या बर्डफ्लूने आता मुंबईतही शिरकाव केला आहे. मुंबईत कावळ्यांचा मृत्यू हा बर्डफ्लूने झाल्याची धक्कादायक माहिती पुण्याच्या पशुसंवर्धन प्रयोग शाळेच्या तपासणी अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर आता बर्डफ्लूनेही मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकली आहे. मात्र, बर्डफ्लूमुळे माणसांना धोका नाही, तरीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
मुंबईतही बर्ड फ्लू -
राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतही चेंबूरच्या टाटा कॉलनीत ९ व गिरगाव येथील बालोद्यानात १२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा घटना घडली होती. या घटनेनंतर पालिका प्रशासन अलर्ट होत या मृत कावळ्यांचे नमुने पुण्याच्या पशुवैद्यकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या अहवालानुसार या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यामुळे लातूर, परभणीत शेकडो कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता मुंबईतही बर्डफ्लूचा धोका असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
धोका नाही, पण काळजी घ्या -
बर्डफ्लूमुळे माणसांना काहीही धोका नाही, तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. कच्चा मांसाहार करू नये. मटण, चिकन, अंडी चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.