मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यात २९ पूल अतिधोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यातील काही पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याने त्याची कामे रखडणार होती. अखेर रेल्वे प्रशासनाने 'महाराष्ट्र रेल इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' या तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला. त्यामुळे रेल्वे हद्दीतील १२ पुलांचे काम करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या पालिकेच्या पूल विभागाने मंजुरीसाठी स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केला आहे. या पूलांच्या बांधकामाच्या खर्चाचा भार महापालिका उचलणार आहे.
मुंबईत आजवर घडलेल्या रेल्वे दुर्घटनांनतर धोकादायक पूल बंद करण्यात आले. तर, काही पूल हद्दींच्या वादामुळे रखडले होते. मात्र, यामुळे ये-जा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे हद्दीतील वादावर मात करून पादचारी पूल व भुयारी मार्गाचे काम मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र रेल इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला सादर केला आहे. ही संस्था महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असून राज्यातील विविध प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी त्यांच्यामार्फत होते. त्यानुसार मुंबईतील रेल्वेवरील पुलांच्या कामांसाठी या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा - कुलदीप सेंगर दोषी ठरल्याने भाजपचा खरा चेहरा समोर आला- आमदार मनीषा कायंदे
सल्लागाराच्या देखरेखीखाली सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ६८ पुलांची कामे करण्यात येत आहेत. तसेच मुंबईतील ११ रेल्वे पूल आणि १ भुयारी वाहतूक मार्गाचे काम संबंधित संस्था करणार आहे. या सर्व पुलांच्या कामांचा प्रकल्प खर्च महापालिकेच्या पूल विभागाकडून उचलला जाणार आहे. या सल्लागार सेवेसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के व्यवस्थापन शुल्क देण्यात येणार आहे. याबरोबरच सव्वा ८ टक्के देखभाल शुल्क आकारला जाणार आहे. तर, रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या कामांसाठी एकूण खर्चाच्या १९.२५ टक्के एवढी रक्कम खर्च होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पुलांच्या खर्चाचा भार वाढणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
रेल्वे लाईनवरील ११ पूल -
भायखळा रेल्वे लाईन पूल, ओलीवंट रेल्वे लाईन पूल, आर्थर रोड रेल्वे लाईन पूल, गार्डन अर्थात एस ब्रिज रेल्वे लाईन पूल, रे रोड रेल्वे लाईनवरील पूल, करी रोड रेल्वे लाईनवरील पूल, बेलॉसिस रेल्वे लाईनवरील पूल, महालक्ष्मी स्टील रेल्वे लाईनवरील पूल, टिळक रेल्वे लाईनवरील पूल, डि.पी. रोडवरील मध्य रेल्वे ओलांडून जाणारा पूल, घाटकोपर रेल्वे लाईनवरील पूल
रेल्वे खालील भूयारी मार्ग -
माटूंगा, लेबर कॅम्प जवळ, हार्बर लाईन
हेही वाचा - शिवरायांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे भाजपचे पाप - सचिन सावंत