मुंबई - महापालिकेच्या अनेक रुग्णालायत कुत्रे आणि मांजरांचा सुळसुळाट आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. मात्र, या प्राण्यांची नसबंदी केल्यावर त्यांना ज्या ठिकाणाहून आणले त्याच ठिकाणी सोडण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने पुन्हा रुग्णालायत सोडण्यात येत असल्याचा अजब खुलासा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी रुग्णालये चालवली जातात. या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असल्याने त्यांना शांततेची गरज असते. आयसीयूमध्ये प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असतात. त्याठिकाणी डॉक्टर व कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त कोणालाही जाण्याची परवानगी नसते. मात्र, गेल्या काही महिन्यात रुग्णालायत कुत्रे आणि मांजरींचा सुळसुळाट झाला आहे. या प्राण्यांकडून रुग्णांना त्रास होत आहे.
याबाबतचा मुद्दा पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. "पालिका रुग्णालायत याआधी रुग्णांना उंदरांनी चावल्याचे प्रकार घडले आहेत. त्यात पालिकेची बदनामी झाली आहे. आता कुत्रे आणि मांजरींमुळे रुग्णांना त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली.
काय केला खुलासा -
नसबंदी केलेल्या प्राण्याला ज्या ठिकाणाहून आणले त्याच ठिकाणी पुन्हा सोडावे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे नसबंदी केलेल्या या प्राण्यांना पुन्हा रुग्णालयात सोडतो, असा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या या खुलाशाने आरोग्य समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी -
कुत्रे आणि मांजरी, रुग्ण आराम करत असताना मोठ्याने आवाज करतात, वॉर्डमध्ये तसेच आयसीयूमध्ये यांचा वावर असतो. यामुळे रुग्णांना या प्राण्यांपासून त्रास होतो. रुग्णांना इन्फेक्शन होण्याचीही भीती असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आल्याचे सईदा खान यांनी सांगितले.