मुंबई- मुंबईत कोरोनाचा कहर कमी होत असून कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रातील एक विभाग असा आहे की जिथे याआधीपासूनच कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. जूनपासून ‘एच पूर्व’ विभाग मुंबईत कोरोना नियंत्रणात 'नंबर वन' होता, तोच विभाग आजही कोरोनाच्या नियंत्रणात आघाडीवर आहे. एच पूर्व, वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ पूर्व या भागाचा समावेश होतो. एच पूर्व विभागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'मातोश्री' निवासस्थान आहे.
एच पूर्व विभागात आजच्या घडीला 3271 कोरोना रुग्ण असून उल्लेखनीय बाब म्हणजे येथील रुग्ण वाढीचा दर वेग केवळ 0.4 टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा दर आश्चर्यचकीत करणारा आहे. कारण हा दर चक्क 166 दिवसांवर गेला आहे. मुंबईत अन्य कोणत्याही विभागाचा दर 108 दिवसांच्या पुढे नाही. त्यामुळे एच पूर्व विभागातील नागरिकांसाठीच नव्हे तर तमाम मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1 लाख 13 हजार 187 जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्या 86 हजार 385 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. 6297 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल-मे-जूनमध्ये मुंबईतील कोरोनाची स्थिती भयावह होती. जुलैमध्ये मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.
दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील 24 पैकी काही विभागात तर कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मुंबईत चार विभाग असे आहेत जिथे रुग्ण दुपटीचा दर 100 च्या पुढे आहे. त्यातही एकमेव एक विभाग असा आहे की ज्याचा दर 150 च्या ही पुढे गेला आहे. तो म्हणजे एच पूर्व विभाग होय. के पश्चिमचा रुग्ण दरवाढीचा दर 105 दिवस असून एस विभागाचा दर 106 दिवसावर आहे. तर एल विभागाचा दर 108 दिवसांवर आहे.
एच पूर्व विभागात पहिला रुग्ण आढळल्यापासूनच पालिकेकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या. त्यातूनच जुलैमध्ये येथे 531 हाऊस सर्व्हे झाला असून यात 2486 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यातून संशयित रुग्णांना शोधण्यात आले आहे.
दरम्यान, मागील आठ दिवसांत एच पूर्व विभागात 12 ते 25 दरम्यान रुग्ण आढळले आहेत. बुधवारी 13, गुरुवारी 13 तर शुक्रवारी 24 रुग्ण येथे आढळले आहेत. एकूणच येथील रुग्णवाढीचा दर मुंबईत सर्वात कमी म्हणजेच फक्त 0.4 टक्के इतका आहे. मुंबईचा रुग्ण वाढीचा दर 0.94 टक्के आहे. मुंबईतील 24 पैकी तब्बल 10 विभागात हा दर 1 टक्क्यांच्या ही वर आहे. एच पूर्वचा दर 0.4 टक्के आहे. या विभागात रुग्ण दरवाढ कमी असल्याने साहजिकच येथे कंटेंनमेंट झोनही कमी आहेत. सध्या येथे 17 कंटमेंट झोन असून 109 इमारती सील आहेत. एकूण रुग्ण संख्या 3271 असून 388 जणांचा मृत्यू झाला आहे. आता येथे केवळ 406 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
कोरोना योद्धा सहाय्यक आयुक्त खैरनार यांना सर्व श्रेय
एच पूर्व विभागातील कोरोना आता नव्हे तर जूनपासूनच नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. याचे सर्व श्रेय एच पूर्वचे कोरोना योद्धा, तत्कालीन सहाय्यक आयुक्त दिवंगत अशोक खैरनार यांनाच जात असल्याचे म्हटले जात आहे. खैरनार यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्यामुळेच 23 जूनला एच पूर्वचा रुग्ण दुपटीचा दर 79 दिवसांवर होता, तर हा विभाग तेव्हा ही मुंबईत कोरोना नियंत्रणात नंबर वन होता.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या खैरनार यांनाच कोरोनाची लागण झाली आणि 11 जुलैला त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतरही एच पूर्वच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोना विरोधातील लढा पुढे नेला. त्यामुळेच आजही मुंबईत एच पूर्वने कोरोना नियंत्रणात आघाडी कायम राखली आहे.