मुंबई: आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने राज्य सरकारने कंबर कसली आहे. शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेवर फोकस केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचा कायापालट करावा, त्याचे ब्रँडिंग करावे, अशा सूचना मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच आज ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करणार आहेत.
सौंदर्यीकरणाचे सादरीकरण: सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहूल शेवाळे, आमदार आशिष शेलार आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले. मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नुतनीकरण (रिसर्फेसिंग), पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटींग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती दिली.
शहराचा कायापालट: मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या 4 महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना या सारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडत आहे. जी-२० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून, त्यातील पहिल्या बैठका ही मुंबईत होणार आहेत. आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळालेला हा मान असून, त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडींग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच स्वच्छता या विषयाला प्राधान्य द्यावे, मुंबई सुंदर करण्यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करावी. महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करावी, महत्त्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सर्वोत्तम संकल्पना: मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची नियमित स्वच्छता झाली पाहिजे. महापालिकेने आवश्यक त्या यंत्रसामुग्री शहराच्या स्वच्छतेच्या गरजा ओळखून घ्याव्यात. स्वच्छतेच्याबाबतीत जगातल्या ज्या सर्वोत्तम संकल्पना आहेत त्या मुंबईत राबवावे. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अंमलात आणावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
भाजपला पोषक असे वातावरण: मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. सत्तेला सुरुंग लावण्याचा मनसुबा भाजपने आखला आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने याचा परिणाम शिवसेनेच्या मतांवर होणार आहे. लावणी संघाने आणि भाजपला पोषक असे वातावरण तयार करून देण्याचा काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचे बोलले जाते आहे.