मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. हे पाणी नालेसफाई केली नसल्याने साचते असे सांगितले जाते. तसेच पावसाळ्यात कोणीतही विक्स कामे केली जात नाहीत. नालेसफाईसह सर्व विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा असे आदेश अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्तांनी केली कामाची पाहणी - रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिन्या या विभागांकडून मुंबई महानगरात विविध ठिकाणी पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी पी. वेलरासू यांनी केली. मुंबईत करण्यात येत असलेली रस्ते, पूल तसेच नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत त्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तैनात करावीत. कामे करताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना देखील वेलरासू यांनी दिल्या आहेत.
या ठिकाणी दिली भेट - पश्चिम उपनगरातील, आर उत्तर विभागात दहिसर नदी पूल, रुस्तमजी रस्ता, आर मध्य विभागात राजेंद्र नगर पूल, सुमेर नगर रस्ता, लिंक रोडवरील राजेंद्र नगर नाला, आर दक्षिण विभागात लिंक रोड व एम. जी. रोड जंक्शन, लालजी पाडा पोईसर नदी पूल, त्याचप्रमाणे पी उत्तर विभागात रामचंद्र नाला, पी दक्षिण विभागात राममंदीर मार्गावर वालभट नदी, के पश्चिम विभागात ओशिवरा नदी, लिंक रोड, मोगरा नाला, लल्लूभाई पार्क मार्ग याठिकाणीही पाहणी करण्यात आली.
गोखले पुलाचे अधिकाधिक काम पूर्ण करा - अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल निष्कासित केल्यानंतर रेल्वेकडून या कामाचे हस्तांतरण बृहन्मुंबई महापालिकेकडे करण्यात आले आहे. या ठिकाणी गर्डर लॉंचिंग, तसेच पूलाच्या दोन्ही बाजुला नवे खांब उभारणे यासारखी कामे महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून प्रगतिपथावर आहेत. स्टील गर्डर निर्मितीचे कार्यादेशही महापालिकेकडून फेब्रुवारी महिन्यातच देण्यात आले आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी याठिकाणची अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचे तसेच संबंधित यंत्रणांसमवेत योग्य तो समन्वय राखण्याचे निर्देश वेलरासू यांनी दिले.
३१ मे पूर्वी गाळ काढा - नाले आणि मिठी नदीमधील गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. मार्च २०२३ पासून ही कामे सुरु झाली असून गाळ उपसण्याचे ३६.८० टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. मुंबई शहरात ४६.३२ टक्के, पूर्व उपनगरात ५६.४९ टक्के, पश्चिम उपनगरात ४४.६१ टक्के, मिठी नदीच्या ठिकाणी २६.७० टक्के, द्रुतगती महामार्गावर १९.२१ टक्के तर विभागातील छोट्या नाल्यामधील ३३.३६ टक्के गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ३०४.५८ मेट्रिक टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व नाल्यातून गाळ काढण्याची कामे दिनांक ३१ मे पूर्वी १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश पी. वेलरासू यांनी दिले.