मुंबई - मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, विज्ञान कुतूहल भवनाची निर्मिती, सीबीएसई शाळा, पालिका शाळा पब्लिक स्कुल म्हणून सुरू करणे, अशा अनेक तरतुदी करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवणार पालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पावर दृष्टीक्षेप -
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार ९४५.७८ कोटींचा अर्थसंकल्प सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांना सादर केला. २०२१ - २२ चा अर्थसंकल्प २०२० - २१ या आर्थिक वर्षात पेक्षा १.१९ कोटींची वाढ आहे. सन २०२० -२१ या अर्थसंकल्पीय वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २५४१.१३ कोटी एवढे आहे. तर आगामी वर्षकरिता म्हणजेच २०२१- २२ साठी महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७ कोटी इतके अंदाजिले आहे. सॅन २०२०- २१ या वर्षाचे भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३०१.३३ कोटी असून तो सुधारित करून १७९.०३ कोटी एवढा अपेक्षीला आहे.
सन २०२१-२२ या वर्षासाठी भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज २४४.०१ कोटी इतके अंदाजिले आहेत. २०१९ - २० या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ७३३.७७ कोटींचा तर २०१८ - १९ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ५६९ कोटी रुपये इतका होता.
शासनाकडून १२६८.६४ कोटी येणे बाकी -
१ जानेवारी २०१६ पासून पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला त्याची राज्य सरकारकडून ८०० कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये प्राथमिक शाळांच्या खर्चापोटी अनुज्ञेय ५० टक्के अनुदान ४६८.६४ कोटी अपेक्षित असल्याने सन २०२१ - २२ च्या महसुली उत्पन्नाखाली १२६८.६४ कोटी इतकी तरतूद प्राथमिक शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान म्हणून प्रस्ताविली आहे.
अर्थसंकल्पात काय -
१) कोविड १९ आरोग्यविषयक अत्यावश्यक साधनांचा पुरवठा - १५.९० कोटी
२) पालिका शाळांचे मुंबई पब्लिक स्कुल असे नाव बदलून पुन्हा सुरु करणार - ५ लाख
३) सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे - २ कोटी
४) उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता करिअर टेन लॅब - २१.१० लाख