मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती -
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले १९९६ बॅचचे आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची आज राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य फिशरीज डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन, मुंबईच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव कुमार हे २००३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
कोण आहेत संजीव जयस्वाल -
संजीव जयस्वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनीही आतापर्यंत महत्त्वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नाशिक व तळोजा (जि. नंदुरबार) येथे काम केले आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. उप मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून जयस्वाल यांनी काम पाहिले आहे.