मुंबई - दिवसेंदिवस मुंबई शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आपत्तिजनक परिस्थीत सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची सदस्य नोंदणी करणे म्हणजे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे आहे. त्यामुळे सद्यस्थितीत बेस्ट कर्मचाऱ्यांची सदस्य नोंदणी न करता परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर नोंदणीस परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे बेस्ट समिती सदस्य गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
भाजपची मागणी -
कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निभावत आहेत. अजूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळाला नाही. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळाली नाही. अशा परिस्थितीत कामगार सदस्य नोंदणीसाठी आग्रह धरणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळ करण्यासारखे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून बेस्ट कर्मचार्यांची सदस्य नोंदणी स्थगित करून सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची नोंदणी करावी, अशी आग्रहाची मागणी बेस्ट समिती सदस्य खणकर यांनी केली आहे.
९० कर्मचाऱ्यांचा मृत्यू -
आतापर्यंत बेस्टचे ३ हजार ३१० अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. यात ३ हजार १२५ जण करोनामुक्त झाले. सध्या ८० जणांवर उपचार सुरू आहेत. कर्तव्यावर असताना करोनाची लागण होऊन ९० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल यांनी दिली. १७ कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर नसताना करोनाची लागण झाली व उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुक्तीचे प्रमाण ९५ टक्के आहे. बेस्टमधील २६ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून त्यापैकी १० हजार कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसही घेतला आहे.