मुंबई - आरएसएस, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्या विरोधात भाजपाकडून देशभर निषेध व्यक्त केला जात आहे. आज आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर येथे जोरदार निदर्शन करण्यात आले.
'अन्यथा उग्र आंदोलन छेडू' -
जावेद अख्तर यांच्या विधानाचा भाजपाकडून संताप व्यक्त होत असून त्यांनी वक्तव्य मागे घेत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. घाटकोपर पश्चिमचे भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या निवासस्थानी गीतकार जावेद अख्तर यांच्या 'तालिबानी' वक्तव्याचा निषेध व्यक्त करत घाटकोपर पोलिसांना पत्र दिले. यावेळी जावेद अख्तर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी आमदार राम कदम यांनी दिला. जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य लाजीरवाणे आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारे आहे. हे अपमानजनक आहे, जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्याचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे चित्रपट या मातृभूमीमध्ये चालू देणार नाही’, असा इशारादेखील राम कदम यांनी जावेद अख्तर यांना दिला आहे.
हेही वाचा - राजू शेट्टींनी जलसमाधी घेऊ नये, त्यांची आम्हाला गरज आहे - जलसंपदामंत्री जयंत पाटील