मुंबई - इंधन दरवाढ विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा युवा मोर्चाकडूनही आंदोलन करण्यात आले. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात भाजप कार्यालयासमोरच हे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारनेही कर कमी करावा -
राज्यात अनेक प्रश्न असताना त्या प्रश्नाचे उत्तर न देता काँग्रेस विनाकारण आंदोलन करत आहे. जर काँग्रेसने आंदोलन केले तर मांडीला मांडी लावून आम्हीदेखील आंदोलन तीव्र पद्धतीने करू, अशी प्रतिक्रिया विक्रांत पाटील यांनी दिली. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती संदर्भात केंद्र सरकारवर बोट ठेवत असताना राज्यातील सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी केला पाहिजे. म्हणून काँग्रेसने आधी स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन करावे, अशी प्रतिक्रिया विक्रांत पाटील यांनी दिली. दरम्यान, यावेळी महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणा देण्यात आली.
हेही वाचा - पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना 'किंग किंवा किंगमेकर' होणार - संजय राऊत
भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केले. काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे पोलिसांना कळताच नरिमन पॉइंट भागातील पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला होता. कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून आंदोलन आणि घोषणाबाजी केली. तर काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आणि या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले.