मुंबई : महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या नावावर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची नोंद आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर देखील पहाटेच्या शपथविधिमुळे सर्वात कमी काळाचे मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे. आज हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. यात आणखी एक योगायोग म्हणजे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. ही तारीख म्हणजे 22 जुलै.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने 22 जुलै ते 28 जुलै हा आठवडा 'अजित उत्सव' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्या वाढदिवसानिमित्त कोणीही जाहिरात बाजी, होर्डिंग लावणे असले प्रकार करू नका अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली आहे. यासंदर्भात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.
खासदार तटकरे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २२ ते ३१ जुलै हा सप्ताह 'अजित उत्सव' या नावाने संबंध महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे. याची जाणीव आम्हाला असून या वाढदिवसाचे प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत.
खा.तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणापासून झाली. त्यांनी सहकार, शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रातही काम केले. त्यांना ज्या - ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यात त्यांनी कामाचा ठसा उमटवला. ते काही काळ लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभा सदस्य, विविध खात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करताना त्यांनी कायम विकासाला महत्त्व दिले. सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवली. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायी भाव आहे. काहींना तो आवडत नसेल मात्र महाराष्ट्रातील जनतेला चांगल्यापध्दतीने तो रुचला आहे.
अजितदादांच्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्राने अनुभवली आहे. महाराष्ट्रातील तरुणाई सुध्दा त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालेली पहायला मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमात सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा विचार पक्षाने केल्याचे तटकरे यांनी सांगितले. रक्तदान शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा, शाळांमध्ये वॉटरफिल्टर, छत्री वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, शाळकरी मुलींना सायकली मोफत देण्याच्या कार्यक्रमा बरोबरच वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे असा सामाजिक उपक्रम राज्यभर सप्ताहाच्या कालावधीत राबवला जाणार आहे असेही तटकरे यांनी सांगितले.