मुंबई - तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या 12 ही आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून या काळात होणाऱ्या नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात येण्यास मज्जाव केला गेला आहे. महाविकास आघाडी सरकारने सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोपी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांचे निलंबन रोखण्यासाठी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
योजना आखून केली कारवाई
राज्य सरकारने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या कमी करण्यासाठी योजना आखून केली गेलेली कारवाई आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
निलंबनाच्या कारवाईविरोधात राज्यपालांकडे तक्रार तर, राज्यभर निदर्शने
बारा आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर भारतीय जनता पक्षाचे सर्व निलंबित आमदार याबाबत तक्रार करण्यासाठी राजभवनावर पोहोचले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारने केलेली कारवाई चुकीची असल्याचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर निदर्शने करण्यात आली.
न्यायालयात जाणार असतील तर, जाऊ द्या - भुजबळ
भारतीय जनता पक्षाचे 12 निलंबित आमदार म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. ते न्यायालयात जाणार असतील तर, जाऊ द्या, न्यायालयात जाऊन त्यांना काहीही साध्य होणार नाही, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव हे सर्वांनाच बोलण्याची संधी देत होते. केंद्राकडे असलेल्या इम्पेरिकल डेटा संदर्भात भारतीय जनता पक्ष कसे खोटे बोलते हे सभागृहात मी मांडत होतो. पण, अचानक काय झाले ते कळले नाही आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य थेट तालिका अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले. तिथे त्यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात झालेला सर्व प्रकार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात मांडला असल्यासाचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
हे बारा आमदार झाले आहेत निलंबित
गिरीश महाजन, डॉ. संजय कुटे, अॅड. आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया या आमदारांचे वर्षभरासाठी निलंबित केले आहे.
हेही वाचा - प्रताप सरनाईक यांच्याकडून क्लीन चिटची मागणी