मुंबई- शिवसेना औरंगाबाद, उस्मानाबाद या नावांचा उल्लेख संभाजीनगर आणि धाराशिव असा करते. त्या नावांचा वापर भाजपच्या रविवारी गोरेगाव येथे पार पडलेल्या विशेष कार्यकारणीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच करण्यात आला. यावरून शिवसेनेच्या नावांचा प्रभाव भाजपच्या कार्यक्रमात दिसून आला.
भाजप कार्यकारिणीच्या विशेष कार्य समितीची बैठक रविवारी गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची नावनोंदणी करण्यासाठी नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यात राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा निहाय नोंदणी करण्यासाठी जिल्ह्याचे फलक लावण्यात आले होते. त्यावर मराठवाडा विभागातील औरंगाबादचे नाव ' संभाजी नगर ' आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव हे ' धाराशिव ' असे करण्यात आले होते. त्यामुळे भाजपवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेनेचा प्रभाव पडला की काय अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
आमच्या पक्षावर शिवसेनेचा प्रभाव पडला असे म्हणता येणार नाही. आम्ही हे शब्द अनेक वेळा वापरत असतो. त्यामागे इतिहास असल्याने आम्हाला ती नावे वापरावी लागतात. मात्र, यासाठी काही सेनेचा दबाव अथवा इतर अशी कोणती कारणे नसल्याचा निर्वाळा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. विवेकानंद उजलंबकर यांनी दिला.
मागील दोन दशकांपासून शिवसेना ही औरंगाबादचे नाव 'संभाजीनगर' आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव हे 'धाराशिव' असे आपल्या सर्वच कामकाजात लावत असते. त्यात ही नावे बदलण्यासाठी सेनेने अथवा भाजपने मागील साडेचार वर्षात सत्ता असताना कोणतीही पाऊले उचलली नाहीत.