मुंबई : नाणार प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्को या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. नाणार प्रकल्पाला विरोध करण्यामागचा नेमका उद्देश काय होता, हा प्रकल्प परदेशात जावा हा अट्टाहास होता का? असा सवाल भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. तसेच सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेला ठाकरे यांनी उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
राज्य पुन्हा अव्वल क्रमांकावर : राज्यातील महायुती सरकारच्या पारदर्शक व गतिमान कारभारामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक होत आहे. आता गुंतवणूकदारांकडून कोणीही हप्ते मागत नसल्यामुळेच अधिकाधिक उद्योग राज्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अव्वल क्रमांकावर आले आहे, असा दावा भंडारी यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि मविआला आव्हान : फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने द्यावे असे, आव्हान माधव भंडारी यांनी केले आहे.
उद्योग कसे बाहेर गेले : भंडारी यांनी सांगितले की, पररराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबत राज्याच्या उद्योग विभागाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध होऊन पाच दिवस उलटले तरी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबद्दल चकार शब्द देखील काढलेला नाही. या श्वेतपत्रिकेतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातून उद्योग कसे बाहेर गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्योग परराज्यात जाण्याची ही आहेत कारणे : भंडारी म्हणाले की, अनेक महिन्यांपासून उद्योग परराज्यात गेल्यावरून मविआचे नेते बिनबुडाचे आरोप करत होते. प्रत्यक्षात मविआ सरकारचा वसुली कारभार आणि निष्क्रियता यामुळेच प्रचंड रोजगार देण्याची क्षमता असलेले उद्योग परराज्यात गेले. गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवत आपले उद्योग परराज्यात स्थापित का केले, याची सर्व माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेमध्ये दिली आहे, असेही ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे नाणार प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली होती.