मुंबई - राज्यात भाजप शिवाय कोणाचेही सरकार बनणार नाही. जे सरकार बनेल ते भाजपच्या नेतृत्वाखाली बनेल. कारण आमच्याकडे अपक्ष पकडून ११९ आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच होणार आहे आणि हे सरकार ५ वर्षे टिकणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आज मुंबईत भाजप आमदार आणि खासदार तसेच राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मुंबई कार्यालयात बैठक होती. या बैठकीत वरिष्ठ नेते मंडळी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर या बैठकीत काय काय चर्चा झाली? याविषयी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.
भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. कारण आम्हाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपला 1 कोटी 42 लाख मते मिळाली आहेत. आमच्या बैठकीत राज्यात भाजपच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे भाजपशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. राज्यात ३ पक्ष सरकार स्थापन करू पाहत आहे. मात्र, त्यांचे सरकार टिकणार नाही, असे पाटील म्हणाले.
गेल्या २ महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यासाठी प्रत्येक आमदाराने आपआपल्या मतदारसंघात जाऊन मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे देखील पाटलांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना लवकर मदत कशी मिळेल? यावर बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 'राहुल गांधी राफेल प्रकरणी माफी मागा', असे आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.