मुंबई : मागील आठ दिवसांपासून अजित पवार हे भाजप बरोबर जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. वास्तविक ही चर्चा खरी ठरू शकते. याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याविषयी भाष्य करताना, काही नेत्यांवर ईडी आणि विविध तपास यंत्रणांचा दबाव भाजपकडून आणला जात असल्याने ते भाजप पक्षात प्रवेश करू शकतात, असे वक्तव्य केले होते. त्यावरून अजित पवार हेसुद्धा भाजपसोबत जातील का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी आज त्यांचे सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द करून मुंबईमध्येच राहण्याचे पसंत केले आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेयासुद्धा उपस्थित राहणार होत्या. अशाप्रसंगी अजित पवार यांनी हे कार्यक्रम रद्द करण्याचे नेमके कारण काय? हेसुद्धा गुलदस्त्यात आहे.
भाजपमध्ये स्वागत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या विचारधारेनुसार काम करणारे कोणीही पक्षात आले तर हरकत नाही. भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे. आमच्याकडे देश, देव, धर्माला मानणारे आले तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांना आमच्या विचारधारेवर काम करावे लागते असे सांगितल्याने अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.
२०१९ ट्रेलर आता खरा चित्रपट : खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात, असा मोठा खुलासा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर बोलताना शरद पवार यांनी कोणालाही मनापासून पक्ष सोडून जायचे नाही आहे; परंतु त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केले जात असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असे सांगत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले होते. त्यावर शरद पवारांनी सांगितले की, कोण कुठेही गेले तरी मी महाविकास आघाडीसोबतच असणार आहे; परंतु अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाहीत, हे त्यांनी ठामपणे सांगितलेले नाही. म्हणूनच अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. २०१९ मधील अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा प्रयोग हा ट्रेलर असून खरा चित्रपट आता दिसणार आहे, असे बोलले जात आहे.
अजित पवारांचे मौन: अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या घडामोडींवर बोलताना या सर्व अफवा असून मीसुद्धा त्याची मौज घेत असल्याचे सांगितले आहे; परंतु असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत भाजप प्रवेशाबाबत यामध्ये बरेच तथ्य दिसून येत आहे. अजित पवारांनी नेहमी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी घेतलेल्या भूमिके विरोधात कधीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. नरेंद्र मोदींची डिग्री बोगस असल्याचे काँग्रेसने म्हटल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसवरच निशाणा साधला. अजित पवार कुठल्याही पद्धतीने काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेसच्या भूमिकेवरसुद्धा त्यांनी मौन धारण केले. तसेच आज पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्यावरही त्यांनी त्याविषयी वाच्यता केली नाही.