मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली. संघ राज्याचा 'तो' विचार मानला तर देशाचे तुकडे होतील, असे सामनाच्या एका सदरामध्ये म्हटले आहे. यावर भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी पलटवार करत जोरदार टीका केली आहे. शिवसेनेची भाषा देश तोडण्याची आहे. मात्र, यावर काँग्रेस, राष्ट्रवादी गप्प का आहेत? असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे.
देश तोडण्याची भाषा -
सामनात प्रसिद्ध झालेल्या सदराबाबत बोलताना राम कदम म्हणाले, राजकारणात आरोप, प्रत्यारोप, कटाक्ष होतच असतात. देश काही प्रमाणात घाणेरडे राजकारण सहनही करू शकतो. मात्र, देश तोडण्याची भाषा कदापी सहन करता येऊ शकत नाही. देशाला तोडण्याची भाषा हा शहिदांचा अपमान आहे. राज्य सरकारने शौविक समिती स्थापन केली होती. या समितीने कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनू शकत नाही. बनवल्यास पाच हजार कोटी रुपयांचा जास्त खर्च होईल, असा अहवाल दिला आहे. त्यानंतरही बालहट्टासाठी कांजूरमार्ग येथे कारशेड हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टिकाही कदम यांनी केली आहे.
काय होते संजय राऊत यांचे रोखठोक बोल -
2020 हे वर्ष अनेक घडामोडींनी चर्चेला आले. त्यामध्ये कोरोनाच्या महामारीने जनजीवन विस्कळीत केले. मात्र, अशा काळातही देशाच्या राजकारणात कुरघोडीच्या आणि सरकार पाडापाडीच्या राजकारणाला अच्छे दिन दिसून आले. या मावळत्या वर्षाने काहीच चांगले पेरले नाही. त्यामुळे नवीन वर्षात चांगले काही उगवणार नाही, अशी शक्यता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ही शक्यता व्यक्त करताना त्यांनी भाजपाच्या राजकारणावर सडकडून टीका केली आहे. भाजपशासीत नसलेली राज्ये या राष्ट्राशी नाते सांगत असताना 'तो'(संघराज्याचा) विचार भाजप सरकारकडून मारला जात आहे. मात्र, राजकीय साठेमारीत जनतेचे नुकसान करणारे अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले तर रशियाप्रमाणे भारतातही राज्ये फुटतील, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.