मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सावरकरांचा द्वेष करणे सुरूच ठेवला आहे. त्यांच्या सोबत जाणाऱ्यांनी त्यांच्या या भूमिकेचा विचार करावा, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेला लगावला आहे. काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी वि. दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याला विरोध केला आहे, यावर भांडारी यांनी प्रतिक्रिया दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत लावून धरली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजपसोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारधारा असून शिवसेना हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे. या दरम्यानच स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह
काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून सावरकरांचा धडा ही वगळला आहे. त्यामुळे सावरकरांच्या कार्याबद्दल शंका घेणाऱ्यांचा विचार सावरकरांवर प्रेम करणाऱ्यांनी करावा, असे भांडारी म्हणाले. केंद्र सरकारने भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या शिफारसींची गरज नसल्याचे जाहीर केल्याने सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भांडारी यांनी सांगितले .