मुंबई - आणीबाणीबाबत ४५ वर्षांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मगितल्यानंतर भाजपनेही गोध्रा कांडवर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने करत भाजपला टार्गेट केले. तर राहुल गांधी यांनी पळ न काढता सांगावे की, त्यावेळचा निर्णय देशासाठी घातक होता, असे अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपने माफी मागावी -
४५ वर्षानंतर राहुल गांधी यांनी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. विधानभवनाच्या मीडिया हाऊस येथे ते बोलत होते. तसेच काँग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी, असेही ते म्हणाले. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती. आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असेही नवाब मलिक म्हणाले. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील मलिक यांच्या मागणीचे समर्थन केले. तसेच राहुल गांधी हे गांधी विचाराचे आहेत, गोडसे नव्हे, असा चिमटाही भाजपला काढला.
हेही वाचा - राज्य सरकारचे सुडाचे राजकारण? चित्रा वाघ यांच्या नंतर प्रविण दरेकर रडारवर
गुन्हाच नाही तर माफी कशी मागणार -
गुन्हा आणि चूक असे सांगून राहुल गांधी पळ काढू शकत नाहीत. त्यांना सांगाव लागेल की त्यावेळी घेतलेला तो निर्णय देशासाठी घातक होता. गुजरात दंगलीत भाजपावर कोणताच गुन्हा दाखल केलेला नाही तेव्हा भाजप यावर माफी मागणार नाही, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले.