मुंबई - लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीने राज्यात 48 पैकी 41 जागा जिंकून घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आता विधानसभेसाठी एका पायावर युती करण्यास तयार आहेत. मात्र, यावर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची क्रांती संघटना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते महायुतीतल्या जागा वाटपाबाबत बोलायला तयार नाहीत.
महायुतीचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत महायुती होणार असून भाजप- शिवसेना प्रत्येकी 135 जागांवर तर घटक पक्षांना 18 जागा देणार असल्याचे संकेत औरंगाबाद येथे दिले आहेत. पाटील यांच्या या फॉर्मुल्यावर मित्र पक्षांचे नेते उघड बोलायला तयार नाहीत.
लोकसभेत या मित्र पक्षांना एकही जागा देण्यात आली नव्हती. यावर रिपाईचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, विधानसभेत मित्र पक्षांना न्याय देण्यात येईल, असा विश्वास ही दाखवला होता. आता भाजपकडून विधान सभेत मित्र पक्षांना 18 जागांचा विचार होतोय. मात्र, यावर मित्र पक्षांनी अधिकृतपणे बोलणे टाळत आहेत. तर योग्य वेळी यावर चर्चा होईल असे दबक्या आवाजात सांगत आहेत.