मुंबई - राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास सगळ्याच पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. आणखी काही ठिकाणच्या जागेवर पेच आहे. या निवडणुकीत भाजपने त्यांच्या ६ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. भाजपने आयारामांना प्राधान्य दिले आहे.
निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजपने अंतर्गत सर्वे केला होता. यामध्ये राज्यातील काही विद्यमान खासदार हे डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपने अशा खासदारांना कट मारला आहे.
या खासदारांना मारला 'कट'
१) दिलीप गांधी (अहमदनगर)
दिलीप गांधी हे नगर दक्षिणचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. यावेळेस त्यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. नव्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दिलीप गांधीच्या विरोधात जनतेमध्ये रोष असल्या कारणाने भाजपने त्यांना तिकिट नाकारले आहे.
२) शरद बनसोडे (सोलापूर)
शरद बनसोडे यांनी २०१४ साली देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळेस त्यांना भाजपने कट मारला आहे. सोलापूरमधून भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद बनसोडे कमालीचे नाराज आहेत.
३) सुनिल गायकवाड ( लातूर)
- लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांची उमेदवारी भाजपने नाकारली आहे. यावेळेस लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना तिकिट दिले आहे.
४) अनिल शिरोळे (पुणे)
अनिल शिरोळेंबद्दल पुणेकरांमध्ये नारजी आहे. तसेच भाजपमधील अंतर्गत गटबाजीच्या कारणांमुळे यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारुन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी उमेदवारी दिली आहे. बापट यांनी २०१४ च्या निवडणुकीलाही भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. अखेर यावेळी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना लोकसभेचे तिकिट दिले आहे.
५) हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी)
भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी मतदारसंघातून ३ वेळेस जिंकून हॅट्ट्रिक केली आहे. तरीही भाजपने यावेळेस त्यांचा पत्ता कट केला आहे. यावेळी त्यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.
६) ए. टी. नाना पाटील (जळगाव)
जळगाव लोकसभा मतदारसंघात दोनदा निवडून आलेले भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.