मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारला फटका बसला आहे. याबाबत प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. आज मराठा आरक्षणासाठीचा काळा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही, खरेतर मराठा समाजावर हा अन्याय आहे. आम्ही जीवाचे रान करून हे आरक्षण टिकवले होते. पण यांनी ते घालवले, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
राज्यातील 32 टक्के मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण राहावे म्हणून आम्ही ते टिकवून ठेवले होते. परंतु, या सरकारला न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही. म्हणूनच आज सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्याने आज राज्यातील तमाम मराठा समाजाच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
आमचे सरकार असताना मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने मोहोर उमटवली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या भकास कामगिरीमुळे सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या आरक्षणाचा निकाल कधी लागेल माहीत नाही. मात्र, ज्या खंडपीठापुढे हा निकाल गेला, असे अनेक निकाल अशा खंडपीठांपुढे वर्षानुवर्षे पडून आहेत. याविषयी आता मराठा समाजाची नाराजी सरकारला सहन करावी लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय खंडपीठापुढे गेल्याने आता आंदोलन करूनही काही उपयोग नाही. मात्र, या आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे नेहमी ट्विट करत, आम्ही असे-तसे काम करत आहोत, असे सांगत होते. परंतु, आज न्यायालयात हे सरकार तोंडघशी पडले. त्यामुळे या महाविकास आघाडीला हे आरक्षण नको होते, अशी टीकाही पाटील यांनी केली.
हेही वाचा - कंगना वादावर संजय राऊतांचे आता 'नो कॉमेंट'
मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी राज्यातील मोठे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रयत्न केलेला नाही, अशी घणाघाती टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे आता मराठा समाज शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. अभिनेत्री कंगनाच्या यासंदर्भात पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करायला शिकवले. परंतु, राज्यातील हे सत्ताधारी तिच्यामागे लांडग्यासारखे लागले आहेत. महाराष्ट्रात नेहमीच महिलांना संरक्षण दिले गेले. मात्र, कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे चुकीचे असेल तर न्यायालयात जा, असे सांगत अप्रत्यक्षरित्या पाटील यांनी कंगनाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर तिच्याकडून करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यावरील एकेरी भाषेच्या संदर्भात पाटील यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. तसेच कंगनाच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कंगना आणि संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या वादात ट्विटवरून पाटील यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत हे कधीपासून इंग्रजी बोलायला लागले आहेत, जेव्हा की दुकानाचा बोर्डही मराठीत लिहायला सांगतात. त्यामुळे तुम्ही इंग्लिश कधीपासून बोलता? असा सवाल करत राऊतांवर पाटील यांनी टीका केली.
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानमंडळात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. त्यात सायन-पनवेल महामार्ग यावर खड्डे बुजवण्यासाठी जे कंत्राट देण्यात आले त्या कंत्राटात 2 कोटीचा अधिक खर्च झाल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. त्यावर खुलासा करताना पाटील म्हणाले की, यात कोणतीही आगाऊ रक्कम खर्च करण्यात आली नाही. आणि सरकारचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर दुसरीकडे जलयुक्त शिवारवर ठेवण्यात आलेल्या ठपक्यावर पाटील म्हणाले की, पाटील हे जलयुक्त शिवार अभियान दहा वर्षासाठी होते, परंतु मध्येच त्यावर ठपका ठेवल्याने यात भ्रष्टाचार होऊ शकत नाही, असा खुलासा त्यांनी केला.
हेही वाचा - कंगनाच्या मनालीतील घरापासून ते मुंबईतल्या निवासस्थानापर्यंतचा घटनाक्रम...
कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याच्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला जे म्हणायचे होते ते आज शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे 'दाल में कुछ काला है' हे खरे आहे. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर अनेक प्रकारची अनधिकृत बांधकामे आहेत. पालकमंत्र्यांची किती अनधिकृत बांधकामे आहेत. त्याची आम्ही येत्या काही दिवसात यादीच देणार आहोत, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.