मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता प्राप्त केली. त्यानंतर भाजपने मास्टर प्लान तयार करत इतरही राज्यांत आपले सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामध्येच शनिवारी (६ जुलै) कर्नाटकामधील काँग्रेसच्या ८ तर जेडीयूच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. सध्या एकूण १३ आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे सोपविला असून कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राजीनामा दिलेले १० आमदार सध्या मुंबईत सोफिटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेले असून हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता कर्नाटकातील काँग्रेस-जेडीयू सरकार टिकते की पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कर्नाटक मध्ये सध्या विधानसभा सदस्य २२४ इतके संख्याबळ आहे. त्यामध्ये सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस आणि जनता दलाचे मिळून सरकार स्थापन झालेले आहे. यामध्ये काँग्रेसचे ६९ जनता दलाचे ३४ तर २ अपक्ष आणि बसपाचा १ असे सदस्य मिळून सरकार स्थापन झालेले आहे. यामध्ये मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजप कडे १०५ सदस्य संख्या आहे. आता जर ज्या काँग्रेस आणि जेडीच्या आमदारांनी राजीनामा दिला ते भाजपच्या संपर्कात आले तर भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजीनामा दिलेले आमदार सध्या मुंबईत आहेत. ते भाजपच्या संपर्कात असल्यामुळे बैठकीसाठी आल्याची माहिती मिळत आहे. हे आमदार पैशासाठी असे करत आहे. हा सर्व पैशाचा खेळ आहे असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. परंतु भाजपचा याच्याशी काही संबंध नाही, असे कर्नाटकचे प्रदेश अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.