मुंबई - नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून स्थानिक भूमिपुत्र विरोध करत असले तरी भाजपानेही विरोधातच भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपाची सत्ता असताना अनेक प्रकल्प आणि योजनांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव देण्यात आले आहे. मात्र, आता भाजपा सत्तेत नसताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून भाजपाकडून उघड विरोध करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागपुरातही विरोध -
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ अनेक योजनांना आणि प्रकल्पांना त्यांचे नाव जरी देण्यात आले असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला राज्यात विरोधही झाला आहे. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मुद्यावर विदर्भ राज्य समिती आणि अखिल भारतीय विकास परिषदेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. या प्राणिसंग्रहालयाच्या गोंडवाना प्राणी संग्रहालय नाव देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव कायम ठेवले. त्यामुळे विदर्भातील नागरिकांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज दिसून येत आहे.
विमातळाच्या नामकरावरून भाजपा आक्रमक -
आता नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केला आहे. मात्र स्थानिक आगरी समाज भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त यांनी ठाकरे यांच्या नावाला तीव्र विरोध केला आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत भावनिक नाते सांगणाऱ्या भाजपानेही आता भूमिपुत्रांची बाजू लावून धरली असून नवी मुंबई प्रकल्पग्रस्तानाचा लढा उभारणारे स्वर्गीय नेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज या मागणीसाठी साखळी आंदोलन करण्यात आले. तर येत्या २४ तारखेला नेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचे पनवेलचे आमदार आणि भाजपानेते प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे - प्रकाश आंबेडकर
नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दि.बां.नी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्यायिक आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे असलेले प्रकल्प आणि योजना
१ ) 'स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना'
सप्टेंबर २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारने स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना' सुरु केली आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य कोणत्याही राज्यातील वा देशातील असली तरीही त्यांना योजनेंतर्गत योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर' मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा सुरू करण्यात आली आहे.
२ ) बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजना -
राज्यातील कृषी व्यवसायला चालना देण्यासाठी १६ मार्च २०२१ रोजी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 10 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) हा प्रकल्प 2019-20 ते 2026-27 या कालावधीसाठी राबवण्यात येत आहे.
३) बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
राज्यात अनेक लहान गावांत आणि ग्रुप ग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:ची इमारत नसल्याने त्या खाजगी जागेत कार्यरत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेत राज्य शासनाने आता राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत असावी याकरीता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु केली होती. ही योजना 17 जानेवारी 2018 रोजी सुरु करण्यात आली आहे.
४) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना
एसटी कर्मचाऱ्याच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘कन्यादान’ योजना असून तिच्या नावाने १७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम एसटी बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवली जाईल. ही मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये मिळतील व या रकमेचा विनियोग विवाहासाठी होऊ शकेल. ही योजना राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असताना २३ जानेवारी २०१६ला एसटी महामंडळात सुरू करण्यात आली आहे.
५) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना
शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणाऱ्या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. ही योजना २० जानेवारी २०१८ महामंडळात लागू करण्यात आली होती.
मोठे प्रकल्प -
१२ जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील रुग्णालयालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. दरम्यान मुंबईमधील नियोजित शिवडी नाव्हा शेवा सी लिंक, बहुचर्चित कोस्टल रोड आणि सिंधुदुर्गमधील उद्घाटनाचा प्रतीक्षेत असलेल्या चिपी विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा कायम आहे. यासंदर्भात अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा -बाबा रामदेव यांचा 'यू-टर्न', कोरोना लस टोचून घेणार!