मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. एकामागोमाग अनेक रुग्ण सापडत आहेत. मात्र, पालिका प्रशासन आणि राज्य सरकार ही परिस्थिती हाताळताना अपयशी ठरलेली आहे, असा आरोप विरोधक करीत आहेत. आता भाजपचे आमदार राम कदम यांनीही केईएम रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर करत 'महाराष्ट्रासह मुंबईत हाहाकार माजला आहे. सरकार कधी जागे होणार?' असा सवाल केला आहे.
केईएम रुग्णालयातील 20ए या वॉर्डातील स्थिती दाखवणारा हा व्हिडीओ आहे. कदम यांच्या नातेवाईकांनी त्या हा व्हिडीओ पाठवला आहे. यामध्ये सामान्य रुग्णांच्या शेजारी कोरोनाबाधितांचे मृतदेह ठेवलेले दिसत आहे. तसेच रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे रुग्णांना खाली फरशीवर उपचार दिले जात आहेत. उपचारासाठी लोक तडफडत आहे. पालिका व राज्य सरकार हे रुग्णांचे हाल करत आहेत, असा आरोप आमदार कदम यांनी केला आहे.
रुग्णालयातील ही परिस्थिती पाहण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकारी आणि सरकारमधील मंत्री अद्याप गेलेले नाहीत. दररोज फक्त बैठका घेत आहेत. या रुग्णालयात उपाय, उपचार काही नाही. सरकारच्या अशा कारभारामुळे अनेक रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णवाहिकेसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत आहे. घरी उपासमारीने लोक मरत आहे, असेही कदम म्हणाले.