मुंबई - महाराष्ट्रात रोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. गुरुवारी पनवेल येथे एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व घटना लक्षात घेता महाराष्ट्रात निर्माण झालेले गुन्हेगारी स्वरूपाचे चित्र, आपल्या राज्याला शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
हेही वाचा... ...म्हणून योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
पनवेल येथे गुरुवारी एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना भयंकर आहे. तर दुसरीकडे राज्यभरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे आता तरी सरकार जागे होणार आहे का ? असा सवाल करत दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात होणाऱ्या घटना संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पोलिसांचा धाक राहिल, अशा काही ठोस उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली. परंतु त्याचा विचार होत नाही म्हणूनच पनवेलसारख्या ठिकाणी महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच सरकारचा आणि पोलिसांचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उरला नाही. म्हणून हे लोक अशा प्रकारे रोज घटना घडवून आणत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याची टीका दरेकर यांनी केली.
हेही वाचा... 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
दरम्यान, भाजपचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडून काढण्यात येत असलेल्या मोर्चात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर दरेकर यांना विचारले असता, राज ठाकरे यांच्या मोर्चात अनेक संघटना स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतील तर त्यात काय हरकत नाही. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे मोर्चा काढत असतील तर त्यात इतर संघटनांच्या लोकांनी सहभागी होणे काय गैर आहे? असा सवाल करत अप्रत्यक्षरीत्या राज ठाकरे यांच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचे आणि भाजपचे असंख्य पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे सूचक विधान केले.