मुंबई : भाजपाचे मुंबईतील नेते तथा आमदार प्रसाद लाड यांच्यावर वॉच ठेवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत खुद्द प्रसाद लाड यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडं तक्रार दाखल केली आहे. प्रसाद लाड यांनी अज्ञात व्यक्तीकडून आपल्या जीवाला धोका असून आपल्यावर वॉच ठेवला जात असल्याची तक्रार दाखल केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनात आपली सुरक्षा वाढवण्याची मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली होती. यावर भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण अशा धमक्यांना तोंड देत असल्याचं स्पष्ट केलं होतं.
काय आहे पत्रातील तक्रार : आमदार प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्यावर वॉच ठेवण्यात येत असल्याचं नमूद केलं आहे. यात त्यांनी राहुल कंडागळे यांनी याबाबतची माहिती आपल्याला दिल्याचं नमूद केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गायकवाड ही व्यक्ती आपल्याला मारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी खार पोलीस ठाण्यात याची रितसर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही या पत्रात देण्यात आली आहे. अनिल गायकवाड यानं त्याच्या सहकाऱ्यांना दगडी चाळ आणि चेंबूरला नेल्याचा उल्लेखही प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात केला आहे.
अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा आरोप : आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या घर आणि कार्यालयाजवळ अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा उल्लेख केला आहे. माझे सहकारी अमित पवार यांच्यावरही पाळत ठेवण्यात आल्याचं प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे. याबाबत गुन्हे व कायदा सुव्यवस्था विभागासह आयुक्तांना तक्रार देण्यात आली. मात्र त्यावर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचं आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या व्यवसायाशी संबंधित आणि श्रमीक उत्कर्ष सभेच्या संबंधित विषयावरुन ही पाळत ठेवण्यात येत असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
विरोधी पक्षांच्या आमदारांना धमक्या : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील आमदारांनी आपल्याला ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे आपली सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी या विरोधी पक्षातील आमदारांची मागणी होती. विरोधी पक्षातील आमदारांची मागणी लक्षात घेत भाजपा नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपण न घाबरता अशा धमक्यांना तोंड देतो असं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -