मुंबई: उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबईतून कोकणात गावी रवाना होत आहेत. परंतु, अद्यापही मुंबई-गोवा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल होत आहेत. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीवर बोलताना भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मनसेवर सडकून टीका केलीय. ते आज मुंबईत बोलत होते.
रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा: मुंबई-गोवा रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा एक मार्गिका ही पूर्णतः गणेश चतुर्थीपूर्वी सुरू केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. परंतु अद्यापही रस्त्याची पूर्ण वाताहात झालेली दिसत आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे फार हाल होत आहेत. त्याचबरोबर मागील दोन दिवसांपासून मुंबई-गोवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण झालीय. या सर्व कारणाने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
नाशिकचा विकास करायला पाच वर्षे: संदीप देशपांडे यांच्या मागणीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, मुंबई -गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये अनेक सरकार बदलली आहेत. परंतु हे काम अद्याप झाले नाही. हे काम एका रात्रीत होण्यासारखे नाही. मंत्री रवींद्र चव्हाण हे सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असून आतापर्यंत सहा वेळा त्यांनी या कामाचा स्वतः कामगारांसोबत आढावा घेतलाय. त्याकरिता मनसेने घाई गडबड करून अशा पद्धतीने मागणी करणे योग्य नाही. मनसेला नाशिकचा विकास करायला पाच वर्षे लागली; परंतु त्यानंतर सुद्धा काय झालं, ते सर्वांनी पाहिले आहे, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
रामदेव बाबांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न: शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखामध्ये आज पतंजली व रामदेवबाबा यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, पतंजलीवर अग्रलेख लिहिण्याचा अर्थ म्हणजे पतंजलीकडून काही आर्थिक लाभ भेटतोय का? हे पाहणे आहे. ज्या पद्धतीने ९० च्या दशकामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांच्यासारखे गँगस्टर बॉलीवूडमधील कलाकारांना धमकावून त्यांच्याकडून पैसे काढत होते. त्या पद्धतीने 'सामना'मधून अशा पद्धतीने धमकी दिली जात आहे. उद्या जर का 'सामना'च्या वृत्तपत्रामध्ये पतंजलीची जाहिरात दिसली तर समजून जायचं की हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता. अशाच पद्धतीचे धंदे करण्यासाठी 'सामना' वृत्तपत्र सुरू असल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा:
- मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे..., नितेश राणेंचा विजयकुमार गावितांना चिमटा; तर मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
- Nitesh Rane On Senate Election : 'यासाठी' हव्यात सिनेट निवडणुका; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Nitesh Rane Warning To Congress : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीनं बसवा अन्यथा... - नितेश राणे