मुंबई - राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना महाविकास आघाडी सरकारने मोफत लस द्यावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
काय म्हणाले पडळकर -
उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी 18 वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 'महाराष्ट्र कधी थांबलाय, ना कधी थांबणार' याच भूमिकेतून आणि पंतप्रधान मोदींनी सुचवल्याप्रमाणे मुख्यमंत्री लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय म्हणून निवडतील. आज सायंकाळी आपले कार्यक्षम मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून 18 वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करतील, अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे', असे पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, बुधवारी राज्यात 67 हजार 468 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 568 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 54 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.