मुंबई - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरणे निसर्गाच्या दृष्टीने कधीही योग्यच आहे. मात्र, यावेळी आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे मूर्तिकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ फक्त यंदा केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर घातलेली बंदी शिथिल करावी, अशी विनंती भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वात मोठा सण असून पेण हे गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या पेणमध्ये दोहे, हमरापूर, कळवे, दादर यासारखी अनेक छोटी गावे ही गणपती कारखान्यांचा एक क्लस्टरच आहेत. गणेश मूर्ती व दुर्गादेवीच्या मूर्ती बनवण्याचे पारंपरिक सुमारे साडेतीनशेहून अधिक कारखाने या परिसरात आहेत. वर्षभर हे कारखाने गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात आणि या परिसरातून सुमारे 50 लाख गणेशमूर्ती कोकणासह राज्याच्या विविध भागात जातात. त्यावर राज्यातील अन्य छोटे मूर्तीकार विसंबून आहेत. त्यामुळे ही एक साखळी असून या परिसरातून अमेरिका आणि विदेशातील आणखी काही देशात निर्यात होतात, असे हे एक उद्योगक्षेत्र असून ते पूर्णपणे अडचणीत आले आहे, असेही शेलार म्हणाले.
आता गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे हे गणपतीचे कारखाने अडचणीत आहेत. हे कारखाने वर्षभर काम करतात. आका त्यांच्या गणेशमूर्ती आता तयार होत असून त्यावर अचानक आता बंदी आणली, तर येणाऱ्या पुढील काळात शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडूची माती, त्यासाठी लागणारे कारागीर, रंग आदी साहित्य सुद्धा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे वेळेत गणेशमूर्ती उपलब्ध होऊ शकत नाहीत, तसेच मूर्ती तयार असणाऱ्या कारखान्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. एकीकडे कोरोनामुळे अडचणीत आलेले हे कारखानदार पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, असे शेलार म्हणाले.
गणेशमूर्ती तसेच त्यानंतर येणाऱ्या दुर्गापूजा हे विशेष श्रद्धेचे सण आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट पाहून केवळ या वर्षासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदी केंद्र सरकारने शिथिल करावी. पुढील वर्षापासून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून शाडूच्या मातीसह पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापर करण्याचा आग्रह धरावा, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.