मुंबई - 'मला गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची सर्वाधिक भीती वाटते' अशी टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा सर्वच स्तरातुन जोरदार समाचार घेतला जात आहे. भाजपचा कंगना रणौतला पाठिंबा आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आम्ही तिच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे भाजप नेते अशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. कंगना रणौतने मुंबईला शहाणपण शिकवू नये, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी कंगनाला धमकी देऊ नये, ती सत्य बाहेर काढेल म्हणून तुम्ही धमकी देत आहात का, असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी विचारला होता. त्यावर राजकीय वर्तुळात कंगनाला भाजपचा पाठिंबा आहे, असे म्हटले जात होते. यावर आज मुंबईत आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आमचे कंगनाला समर्थन नाही, असे ,स्पष्ट केले.
'राम कदम यांचे वक्तव्य हे वैयक्तिक आहे. ती पक्षाची भूमिका नाही. सुशांतसिंह प्रकरणात चौकशी सुरू असताना, विषय दुसरीकडे नेण्यासाठी कंगनाच्या पाठीमागून संजय राऊत यांनी वार करण्याची गरज नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या दररोज खळबळजनक ट्वीट करून गोंधळ उडवून देत आहे. मुंबईत सुरक्षित वाटत नसून पाक व्याप्त काश्मीर मध्ये आपण आलो की काय?, अशी टीका करणारे ट्वीट कंगनाने केले होते. या तिच्या वक्तव्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्याबाबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हीकंगना रणौत यांना मुंबईतील सुरक्षा पटत नसेल तर त्यांनी आपला गाशा गुंडाळावा, असे वक्तव्य केले होते.