मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित केल्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली. 'तुम्ही विरोधी पक्षात होतात, त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करून दाखवा! राजकारण करू नका हे नेमकं कुणाला सांगताय? खासदार संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खासगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का? काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही, अशा शब्दांत शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्री महोदय दररोज भाषण देत आहेत. त्यापेक्षा काहीतरी करून दाखवा, असेही शेलार म्हणाले. मुख्यमंत्री वारंवार आपले वक्तव्य बदलत असतात. पूर्वी केंद्रीय पथकाने आकडे दिलेच नाहीत म्हणाले होते. मात्र, आता पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण राज्यात आहेत, असे म्हणाले, याचा अर्थ मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत, असेही शेलार म्हणाले.
अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. रुग्णालयात रुग्णांना दाखल केले जात नाही. रुग्णवाहिका, खाटा अपुऱ्या आहेत. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. नुसती भाषणे नको, आता करून दाखवा, असेही शेलार यांनी म्हटले आहे.